राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता.आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे.”पवारसाहेब जितेंद्र आव्हाड यांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांनी असे बोलू नये, माझी त्यांना विनंती आहे,” असे देखली मिटकरींनी स्पष्ट सांगितले.
“मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे. यानंतरही महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?”
शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली नाही. मात्र काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्यासाठी त्रासदायक आहे. शेवटी पवारसाहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. फूट पाडणारे लोक आता जनतेच्या समोर आले आहेत, असे मिटकरी म्हणाले.तसेच अजित पवार यांनी स्वत: जागा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालये उभारले आहेत. त्यामुळे कोणी तिथे दावे करु नये, असे देखली मिटकरींनी स्पष्ट सांगितले.
