अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सरकारमध्ये जायचं ठरवलं तेव्हा काय काय गोष्टींना, कायदेशीर बाबींना सामोरं जायचं त्याची चर्चा करुनच निर्णय घेतला. सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की या मार्गाने गेलं तर अपात्रतेचा निर्णय होणार नाही. दोन ते चार कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास बसला त्यानंतरच आम्ही सरकारमध्ये जाण्याची पावलं उचलली आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. सरकारमध्ये सामील होण्याआधी कागदपत्रे व सह्या केल्या आहेत. आम्ही पक्ष आणि चिन्हावर दावा दाखल केला आहे. अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत व राहतील, अशी वाच्यता केली आहे. पक्षाची घटना प्रचलित राजकीय पक्षाचे नियम याची चर्चा करून मांडणी आधीच केलेली आहे, असेही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. जितेंद्र आव्हाड आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचं आमच्यावर प्रेम दिसणं स्वाभाविक आहे. माझ्यावरच नाही त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. पण असल्या प्रेमामुळेच ज्या काही घटना घडल्या त्या झाल्या नसत्या असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
