एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार; काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करताना शिंदे गटासोबत चर्चा करायला हवी होती, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या चर्चांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजप पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बावनकुळे म्हणाले, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार म्हणून विरोधी पक्षातील काही नेते संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र,2024 पर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमच्यामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही असंही बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, काही लोक राज्यात केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना आणखी चर्चा करणे गरजेचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांनीजो पक्ष सोडला तो त्यांना त्रास झाला म्हणून सोडला. आम्ही कोणताही प्रयोग केला नाही.अजित पवार गटाने आज बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या बैठकीला 18 आमदार उपस्थित होते, असे पक्षाच्या दोन्ही गटातील सूत्रांनी सांगितले. उर्वरित 3 आमदारांची भूमिका स्पष्ट नाही.

दरम्यान, अजित पवार यांची मंत्रिपदाची शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत ही गोष्ट नाकारता येणार नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अचानक आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. शिंदे गटाच्या कोअर कमिटीची काल बैठक पार पडलेली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली आहे.