वंचितचा मविआत समावेश होणार की नाही ? ठाकरेंनी 15 दिवसांत निर्णय घ्यावा; शरद पवारांनी पेरलं तेच उगवलं या आरोपांमध्ये तथ्य नाही-प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीतील फुटीवरून प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही?, याबद्दल येत्या 15 दिवसांत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिल्याने वंचित आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्हं आहे.

वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.लवकर निर्णय झाला नाहीय तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय.ते अकोल्यात बोलत होतेय.आंबेडकरांचं भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर ‘थँक्यू’ म्हणत बोलणं टाळलंय.राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर अजित पवारांची स्तुती केलीय. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ असल्याची स्तुतीसुमनं आंबेडकरांनी अजित पवारांवर उधळली आहे.

पवारांनी जे पेरलं तेच उगवलं या आरोपांमध्ये तथ्य नाही

शरद पवारांवर होत असलेल्या ‘पेरलं तेच उगवलं या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केलंय ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. राजकारणातले ‘रणछोडदास’ सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आलेत.चौकशांच्या छायेखालची लोकं अजित पवारांसोबत गेली, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अजित पवारांनी कालच्या भाषणात काल शरद पवारांसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटांबद्दल आपण सातत्याने बोललो. अजित पवारांनी केलेले चारही गौप्यस्फोट त्यावर शिक्कामोर्तब करणारे आहे. वंचित आणि उद्धव ठाकरेंना सोबत लढायचं असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे.

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे.