काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की नाही? याबाबत आज गुजरात उच्च न्यायालय निकाल देणार आहे. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर न्यायालय निकाल देणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
न्यायालयानं दोषी ठरल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये केंद्र सरकारवर आरोप करत गंभीर वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, पण ते घाबरत नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी एप्रिलमध्ये गुजरात उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितलं होतं की, मोदी आणि तेली यांच्यासह अनेक लोक गुजरातमध्ये मोदी आडनाव लिहितात. राहुल यांच्या वक्तव्याचा सर्वांशी संबंध जोडणं योग्य नाही. देशातील 13 कोटी जनतेची बदनामी झाल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्त्यांच्या या वक्तव्याला काहीच आधार नसल्याचं सिंघवींनी आपल्या युक्तीवादा दरम्यान म्हटलं होतं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर सुरत येथील सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानेही त्यांचे सदस्यत्व (खासदार पद) रद्द केले होतं.
आज जर राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र जर स्थगिती मिळाली नाही, तर दोन वर्षांची शिक्षा राहुल गांधी यांना भोगावी लागू शकते. मात्र यासगळ्यात महत्वाचे म्हणजे राहुल गांधींची खासदारकी आठ वर्षांसाठी धोक्यात येऊ शकते.
