राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेच काम करत होतो. आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे असा एक त्रिशूळ तयार केला जो विकासाचा त्रिशूळ आहे. जो त्रिशूळ या महाराष्ट्रातील गरीबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे भोळादेखील आहे पण, जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्याकरता तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारा त्रिशूळ आमच्या तिघांच्या माध्यमातून पहायला मिळेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे सरकारमध्ये स्वागत केले आणि विरोधकांना खणखणीत इशारा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतान देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिदुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत महाराष्ट्र सरकार पोहोचत आहे. अजितदादा सोबत आल्याने आता या भागाचा विकास अधिक गतीने होणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हमाले, गडचिरोलीतून केवळ कच्चा माल दुसरीकडे न्यावा, हे आता थांबायला हवे. अनेक उद्योगांसाठी कच्चा माल गडचिरोलीत उपलब्ध असल्याने आता कारखानेही गडचिरोलीत उभारावेत, यासाठी सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. येथून केवळ कच्चा माल नेऊ दिला जाणार नाही.गडचिरोलीत विमानतळ सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ते करणार. घरेही देणार आहोत. या जिल्ह्यात मायनिंग प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. पण हे करताना जिल्ह्यातील निसर्ग संपदा, पर्यावरणाला कोणताच धक्का लागणार नाही याची ग्वाही देतो. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आगामी काळात आणखीही काही योजना सुरू करणार आसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या आहेत याचीही माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
खनिजे गडचिरोलीमधून येतात. त्यामुळे इथेच प्रक्रिया केल्यास गुंतवणूक इथेच झाली पाहिजे. छत्तीसगडमध्ये पोलाद सिटी उभी झाली, तशीच पोलाद सिटी गडचिरोलीमध्ये उभी झाली पाहिजे. तेव्हाच तरुणांच्या हाताला काम मिळाले. अनेक मोठे उद्योजक गडचिरोलीमध्ये येणार आहेत. मात्र गडचिरोलीमधील संस्कृती, जल, जंगल, परंपरा याला धक्का लावू देणार नाही. पर्यावरनाला धक्का लागू न देता विकास करू, लायमिंग झाले तरी गडचिरोली मध्येही धरोवर नष्ट होऊ देणार नाही, अशी हमी नागरिकांना फडणवीसांनी दिली आहे.
