रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका दिसली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं हे राजकारणाचा एक भाग होता. पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय हे सर्वसामान्यांसाठी थेट फायदा देणारे ठरले आहेत. यामध्ये महिलांसाठीचा एसटी बसच्या तिकीटाचा निर्णय आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवासाचा निर्णय यांचा समावेश आहे. याशिवाय असे अनेक काही निर्णय आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपला ताफा अडवत मुंबईत एका रुग्णाला मदतीसाठी धावून गेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टरांना फोन करुन उपचाराच्या सूचनादेखील दिल्या आहेत.

या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्याना समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्याने त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.

मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेने मदत केलेली पाहुन सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानिमित्ताने त्यांच्या संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाला आहे.