राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. योग्य वेळी भाकरी फिरवली असती, तर ही वेळ आली नसती. योग्य वेळी भाकरी फिरवली असती तर कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचा विश्वास कायम राहिला असता. मला आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
‘आता उद्धव ठाकरे यांची मजबुरी आहे. जर त्यांनी पहिले म्हणजे कोरोना काळात दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे हे आमच्या बरोबर आले नसते..’ असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.
‘उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंची मजबुरी आहे काय करतील. पहिले कोरोना काळात दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्या बरोबर आले नसते. तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसले म्हणून आता त्यांना दौरे करावे लागत आहेत. म्हणून कधी ना कधी कष्ट करावे लागतात. आधी अभ्यास करा नंतर जीवन सुखाचं होईल.. आधी अभ्यास केला नाही तर नंतर जीवन कष्टाचं हे साधारण सूत्र असतं.हे आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं नसेल.’ अशी अत्यंत बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. अपात्रतेचे निर्देश उद्धव ठाकरेच्या आमदारांनाही देण्यात आले आहेत. नोटीस देऊन टाकल्याने अपात्रता होत नाही. संविधान आणि कायदे आहेत. याचे काही नियम आहेत. उद्या कोणीही नोटीस देऊ शकतो, त्यांच्याकडे पक्षच नाहीये. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, म्हणत ते एकटेच फिरत आहेत, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
