शिवसेनेतून मुंबईतील माझगावचे आमदार राहिलेले छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढले. शिवसेना सोडल्यानंतर येवल्यात गेल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या नेत्याविरोधात सामना करावा लागला होता. तिथे चार टर्म आमदार राहिल्यानंतर आता छगन भुजबळांनी राष्ट्रवादीतील फुटीदरम्यान शरद पवारांशी फारकत घेतली. त्यामुळे शरद पवारांनी समस्त येवलावासियांची काल (८ जुलै) माफी मागितली. “माझा अंदाज फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचाराला तुम्ही साथ दिली. मात्र, माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या”, असं शरद पवार म्हणाले. भर जाहीर सभेत शरद पवारांनी माफी मागितल्याने छगन भुजबळांनी आता उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
‘मला हेच कळालं नाही, ते इकडं का आले, त्यांनी बारामतीमध्ये सभा का नाही घेतली.कदाचीत त्यांना वाटलं असेल कि, हा ओबीसी नेता आहे, आपण याच्याकडे गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल. साहेब, मला वाईट वाटलं, तुम्ही माफी कशाला मागता, आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार. राज्यभरात माफी मागत फिरणार का? ५० ठिकाणी? गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत तुम्ही माफी मागणार का? असा प्रश्न देखील भुजबळ यांनी शरद पवार यांना केला आहे.
शिवसेनेत मी नेता होतो. दोन वेळा आमदार आणि महापौर होतो. त्यामुळे मी ऐरागेरा नाही, असे ते म्हणाले.तेलगी घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले आणि माझे उपमुख्यमंत्री पद गेले. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली त्यात मी निर्दोष झालो.मला कारण नसता राजीनामा द्यावा लागला, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.जुन्नर येवला आणि इतर काही ठिकाणी मला उमेदवारीची गळ स्थानिकांनी घातली होती. म्हणून पवार साहेबांना मला येवल्यात विकासासाठी पाठवा असे सांगितले. त्यामुळे येवल्यात पवारांनी माझी नाही तर मी येवल्याची निवड केली.सुरक्षित मतदारसंघ वगैरे नव्हता पण आपण जे काम केले त्यावर चार वेळेस निवडून आलो असे भुजबळ यांनी सांगितले.
2019मध्ये शरद पवार मोदींना भेटले. त्यांच्याशी युतीचं ठरवून आले. निवडणुकीनंतर भाजपशी समझोता करायचा ठरलं. अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वाद झाला. तेव्हा भाजपने सांगितलं आम्ही शिवसेनेला सोडतो तुम्ही येणार ना? होकार मिळाल्याने भाजपने शिवसेनेला सोडलं. या सर्व चर्चेत मी नव्हतो. मला कधीच शरद पवार यांनी कोणत्याही चर्चेत पाठवलं नाही. मी गेलोच नाही. तुम्हीच हे सर्व केलं आणि मलाच दोष देता? असा सवाल त्यांनी केला.
