उद्धव ठाकरे घरात बसले नसते तर पक्षाची अशी वाट लागली नसती – संजय शिरसाट

उद्धव ठाकरे अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला नामर्दांचा पक्ष आहे, अशी टीका केली होती. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अपात्रतेच्या विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत भाजपवर अनेक आरोप केले होते.

उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये एका सभेत भाजपाचा नामर्द असा उल्लेख केला. यासंदर्भात बोलताना हे त्यांना पंचवीस वर्षानंतर कळालं का? असा प्रश्न शिरसाट यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, पंचवीस वर्ष ज्यांच्याबरोबर आपण राहिलो त्यांच्याबरोबर आपण युतीमध्ये राहिलो, सत्ता भोगली. एकमेकांच्या बरोबर जेवणावळी काढली. एकमेकांना नमस्कार केलेत. एका व्यासपीठावर राहिले. त्यामुळे पंचवीस वर्षानंतर अशा खालच्या पातळीवरची टीका करणं मला वाटतं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी केली.

यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, “घरात बसतं होते हाच मोठा त्रास होता. ते जर घरात बसले नसते तर आमदार नाराज झाले नसते. आमदार नाराज झाले नसते, तर त्यांनी उठाव केला नसता. उठाव केला नसता, तर पक्षाची अशी वाट लागली नसती. म्हणून घरात बसंण किती घातक आहे. मग एकीकडे आपण म्हणतो ८३ वर्षांचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले. जर ते असं करु शकतात, तर आपण अडीच वर्ष घरात बसून काय केलं? हा प्रश्न सुद्धा सर्वसामन्य जनता आपल्याला विचारतीये.”