सोबत आलेल्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-भाजपा सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक नेते आणि आमदार सहभागी झाल्याने सत्तेतील समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे शिवसेनेला काही मंत्रिपदांवर पाणी सोडावं लागले आहे. तर आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण महायुती म्हणूनच लढविणार आहोत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. ठाण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारसोबत का घेतले? या प्रश्नाचेही उत्तर दिले. ते म्हणाले की, राजकारणात काही बेरजेची गणिते असतात. त्यासाठी नव्या मित्रांची गरज असते. पण यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असून, माझ्यामागे 200 हून अधिक आमदारांचे पाठबळ आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्यकर्त्यांनी अहंकार बाजूला ठेवून काम करायचे असते. जनतेचे हित कशात आहे, ते पाहूनच राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायला हवेत. केंद्र सरकार आज राज्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देत आहे. सुरुवातीची अडीच वर्ष केंद्र सरकार मदतीसाठी तयार असायचे, मात्र राज्याकडून काही मागितले जात नव्हते. कितीतरी योजनांचे पैसे केंद्राकडे पडून होते. आता मात्र प्रत्येक पैसा वापरात येत आहे. रखडलेले रेल्वे प्रकल्प आपण सुरु केले. यापुढेही केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिकेत इतके वर्षे सत्तेत असणारेच आता मोर्चे काढू लागले, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.