उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वंदे भारत ट्रेनमध्ये मुंबई ते नाशिक केला प्रवास

राज्याचे उपमुख्यमंत्री नवनिर्वाचित अर्थमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान, नाशिकपर्यंतचा प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदे भारत ट्रेननं केला.अजितदादांचं मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, कालच अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर.अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली.

नाशिक येथे अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक रोड ते शासकिय विश्रामग्रहापर्यंत कार्यकर्त्यांकडून बाइक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी भव्य तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणाक शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अजित पवारांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.