विरोधकांची स्वार्थासाठी तत्वांशी तडजोड; विरोधक जवजवळ येऊ शकतात पण सोबत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये ‘एनडीए’तील मित्रपक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल केला. त्याशिवाय एनडीएचा अर्थही सांगितला. विकास हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशभरातील एनडीएचे सर्वच घटकपक्ष या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. 2014 पासून देशात केलेल्या विकासकामाची माहिती दिली. त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचे सांगितले.

एनडीएच्या या बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या एकीवर हल्लाबोल केला. काँग्रेसने पक्षांचा स्वार्थासाठी वापर केला. आम्ही विरोधी पक्षात असतानाही सकारात्मक राजकारण केले, आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही. देशातील लोक पाहत आहे की हे पक्ष का जमत आहेत? या पक्षांना जोडणारा दुवा कोणता आहे, हेही जनतेला माहीत आहे. आपल्या स्वार्थासाठी मूल्ये आणि तत्त्वांशी कशी तडजोड केली जात आहे, हे सर्वांना दिसत आहे.

‘आमच्यासाठी गठबंधन मजबुरी नाही तर मजबुतीचं माध्यम आहे दुर्दैवाने विरोधकांनी त्यांची एकच ओळख तयार केली आहे, आम्हाला शिव्या देणं, आम्हाला खाली दाखवणं’, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. आम्ही विरोधकांना कधीही शत्रू मानलं नाही. आम्ही प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न तर शरद पवार आणि मुलायमसिंह यादव यांना पद्म पुरस्कार दिला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंह बादल, अजित सिंग, शरद यादव या नेत्यांनी एनडीएला आकार देण्यात योगदान दिलं. एनडीए अटल बिहारी वाजपेयींची विरासत आहे, लालकृष्ण आडवाणी यांनीही याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

विरोधक स्वार्थासाठी तत्वांशी तडजोड करीत आहेत. या सर्व गोष्टी जनता डोळ्याने बघत आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारसरणीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले सुरु आहेत. पण टीएमसीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाहीत, विरोधकांची हकीकत आत जनतेच्या लक्षात आलीय, त्यामुळे विरोधक जवजवळ येऊ शकतात पण सोबत नाही येऊ शकत नसल्याचं भाकीत मोदींनी केलं आहे.