एकीकडे विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात मोट बांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही विरोधकांच्या विरोधात आपलं बळ उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काल दोन्ही आघाड्यांची बैठक पार पडली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसने इंदिरा गांधींसाठी दिला होता. तोच नारा मोदींसाठी दिला. मोदी म्हणजे इंडिया. इंडिया म्हणजेच मोदी, असा नाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.
एनडीएच्या बैठकीत सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी शिंदे यांनी एनडीए देशात 350 पेक्षाजास्त आणि राज्यात 45 पेक्षाहून अधिक जागा जिंकेल, असं म्हटलं. आगामी लोकसभा निवडणुका सोबत लढणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 45 जागा निवडून आणणार असल्याच शिंदेंनी नमूद केलं. अजित पवार यांनी देखील सोबतच निवडणुकी लढविणार असल्याचं म्हटलं.
काळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये तर अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले दिसत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत बंद दाराआड या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीतच होते. त्यांना रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली.
