माझा वाढदिवस साजरा करु नका, जाहिरातींवर खर्च न करता निधी इर्शाळवाडीच्या पुनर्उभारणीसाठी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी इथे काल (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुख व्यक्त करत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन केलं आहे.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 80 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. मात्र जोरदार पाऊस आणि वाट निसरडी झाल्यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहेत.

अजित पवार यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रम रद्द झाल्यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरसालवाडी गावाच्या मदतीसाठी आणि या दुर्घटनेचा फटका बसलेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

“दरड जिथे कोसळली तो भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. ही घटना समजल्यानंतर, साडेसात पर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. एकंदरीतच पाच लोक अद्यापपर्यंत दगावली आहे. जखमींना पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरने छोटं मशिन पाठवायचं असेल तर ते एक टन पर्यंतच वजन उचलू शकत आहे. तसंच, हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही”, अशी माहिती अजित पवारांनी सकाळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.