कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचंही सांगितलं जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

संजय राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोपा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने आज सकाळी सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.

जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. या कंपनीने जे डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा दाखवली ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, असा आरोप ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात केला आहे. तसेच आता या प्रकरणी ईडीकडून आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

डॉ. किशोर बिसुरे हे मुंबई महापालिकेचे डॉक्टर असून ते दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. सुजित पाटकर यांनी लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलमध्ये जम्बो कोविड सेंटरचा करार केला होता, अशा माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती.