रायगड इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत 98 जणांना वाचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची माहिती देवेंद्र फडणीसांनी सभागृहात दिली. रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून आत्तापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या मदतकार्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे बराच वेळ चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण झालं आहे. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे.

आत्तापर्यंत 98 जणांना वाचविण्यात यश आले आहे. सकाळी सव्वा दहा पर्यंतच्या माहितीनुसार आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यास आहे. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब ही बाधित झाली आहे, असे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. 228 नागरिकांपैकी 70 नागरिक हे स्वत: घटनेच्यावेळी सुरक्षित असल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे. 21 लोक जखमी असून 17 लोकांना तात्पुरत्या बेस कँपमध्ये उपचार करण्यात आले तर 6 जणांना पनवेल्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.”

“ही दुर्दैवी घटना घडली असून गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. जेसीबी जात नसल्यामुळे दोन ते अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का असा विचार प्रशासन करत आहे. तर मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी असून ते वेगवेगळ्या एजन्सीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर दादा भुसे, उदय सामंत, स्थानिक आमदार तिथे उपस्थित असून ते नातेवाईकांना आधार देत आहेत.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.