मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करणार; जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे अख्खे गाव उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले व मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी या घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार योग्य ती मदत करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (इर्शाळगड ) इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.