शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँड राष्ट्रवादीच्या सात आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

२ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला. कारण हाच तो दिवस होता ज्यादिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह या दोहोंवर दावा सांगितला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. या गटाला दिलासा देणारा आणि शरद पवारांना झटका ठरणारी एक बाब आता समोर आली आहे.

अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं.

याबाबत माहिती देताना राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सचिव ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, आज प्रदेशाध्यक्ष वानुंग ओडिओ यांनी नवी दिल्लीत येऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सुनील तटकरे यांची भेट घेतली व नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाची माहिती दिली व आमदारांसह सर्व पदाधिकार्‍यांना पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र सुपूर्द केले.यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नागालँड युनिटच्या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त करत प्रदेशाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले तसेच पक्ष मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्वी नियुक्त केलेल्या नागालँड राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा युनिट्सना नेहमीप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या.