कुटुंबाची इच्छा होती म्हणून पंतप्रधानांना भेटलो, केवळ सदिच्छा भेट होती, राजकारणावर चर्चा झाली नाही – मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीत गेले. मध्यरात्री 1 वाजता ते दिल्लीत पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं. त्यामुळे शिंदे दिल्लीत अचानक आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आज दुपारी त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंबाला घेऊन ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानांशी विविध विषयावर चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुटुंबाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. आज केवळ पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी राज्यात सुरू असलेले प्रकल्प, धारावी प्रकल्प, राज्यातील पावसाची परिस्थिती याबात मोदींनी चर्चा केली. इर्शाळवाडी येथील घटनेबाबत नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील मोदी यांनी जाणून घेतले. मोठ्या प्रकल्पांवर देखील मोदी यांनी चर्चा केली. केंद्राचे नेहमी राज्याला पाठबळ असते. बंद प्रकल्पांना आम्ही चालना देली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ईर्शाळवाडीच्या घटनेसोबतच, शेतकऱ्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांशी निगडीत योजनांवर देखील या भेटीत चर्चा झाली. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत प्रकल्पावरविषयी देखील त्यांनी जाणून घेतलं. मेट्रो, कारशेट, बुलेट ट्रेन तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी मी चर्चा केली. कोकणातील समुद्रात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येईल. यावर शासन गांभीर्याने काम करत आहे, ही बाब मोदींच्या कानावर घातल्याचे शिंदे म्हणाले.

शिंदे कुटुंबातील चार पिढ्या पंतप्रधानांना आज भेटल्या. स्वत: एकनाथ शिंदे होते, त्यांचे वडील होते, मुलगा श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत यांचा मुलगाही पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचं सर्व कुटुंब होतं. माझे वडीलही होते. ही सदिच्छा भेट होती. मोदींनी आम्हाला बराच वेळ दिला. त्याबद्दल त्याचे आभार मानले.पंतप्रधानांची भेट घेतल्याने वडिलांना समाधान वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काल शुभेच्छा दिल्या होत्या. देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याचा कारभार पुढे नेतोय. त्यामुळे चांगले सहकारी आहेत. त्यांना चांगलं काम करण्यासाठी उत्तम आरोग्य मिळावं, अशी मी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिली.