संत शहीद कंवरराम यांना भारतरत्न देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार – खा. डॉ. अनिल बोंडे यांचे अभिवचन

संत शहीद कंवरराम यांचे अखंड भारताचे स्वप्न होते. हिंदू मुस्लिमांमध्ये दरी न पडू देता त्यांनी प्रेमाचा, सद्भावनेचा व सदाचाराचा संदेश प्रसारित केला. अशा महान विभूतीला सरकारने देशातील सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान बहाल करुन गौरव करावा, यासाठी आपण केंद्र व राज्य सकरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले.

खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आज संत शहीद कंवर राम यांच्या ८७ वर्षीय कन्या परमपूज्य ईश्वरी देवी यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान केला. तसेच त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले. नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला संत कंवरराम यांचे नातू श्री संत राजेश मोरोडिया, माजी नगरसेवक विकी कुकरेजा यांच्यासह सिंधी समुदायातील अनेक बांधव उपस्थित होते. दरम्यान उपस्थित असलेल्या नागरिकांनी, संत शहीद कंवरराम यांचे असलेले अनन्यसाधारण योगदान पाहता त्यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्याकडे उपस्थित केली. बोंडे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्याकडे शाहिद श्री संत कंवरराम यांना भारतरत्न देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार डॉ.अनिल बोंडे यावेळी म्हणाले.महान कर्मयोगी, त्यागी,तपस्वी असलेल्या श्री संत शहीद कंवरराम यांचे विविध क्षेत्रात अनन्य साधारण योगदान आहे. विशेष म्हणजे, धर्म जागरण आणि सामाजिक कार्यात त्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना त्यांनी प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्यास अविरत परिश्रम घेतले. त्यामुळे देशभरात त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सुद्धा आपण कटिबद्ध असल्याचे डॉ.अनिल बोंडे यांनी नमूद केले.