यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले; सुटकेसाठी लष्कराचे हेलिकॉप्टर दाखल झाले

राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. विदर्भात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. यवतमाळमध्ये पावसाचा जोर वाढल्याने आनंदनगर तांडा येथे 45 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर, घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरर्स मागवले. हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरने आता बचावकार्याला सुरूवात झाली आहे.

“हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यामातून सर्व गावकऱ्यांचं रेस्क्यू केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यवतमाळमध्ये आज जवळपास 240 मिमी पाऊस पडला. वेगवेगळ्या तालुक्यातून 5 हजार पेक्षा जास्त नागरिकांची सुरक्षित स्थळी हलवलं आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पुराच्या पाण्याच अडकलेल्या 200 नागरिकांना जिल्हा पथक आणि एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू केलं आहे”, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना दिली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरने लोकांना काढण्यात येणार आहे. नागपुरवरून हेलिकॉप्टर आल्यानंतर लोकांना तेथून काढायला सुरुवात झाली आहे. शिवाय, जिल्ह्यातील नदीकाठावरील अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरले. बेम्बला प्रकल्प, अडान धरणातून पाणी सोडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. महागाव तालुक्यातील आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

‘यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.