मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ( २२ जुलै ) सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचं लोकेशन बघा. प्रत्येक दोन दिवसांनी ते दिल्ली जातात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. याला आता मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वेळ आली आहे. त्यावर दादा भुसे म्हणाले, की प्रत्येकाने आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे.आपल्याला अजुन लांबचा प्रवास करायचा आहे. आपले अजुन दुधाचे दातही पडलेले नाहीत. त्यामुळे ज्याने त्याने आपल्या मर्यादेचे भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर दादा भुसे यांनी सांगितलं की, या असल्या अफवांवर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही. असं काहीही होणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहोत. महाराष्ट्राचा विकास जलद गतीने होत आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या निधीवर दादा भुसे म्हणाले की, लोकप्रतिनिधींना त्यांच्या सूचनेप्रमाणे निधी मिळाला आहे. निधीबाबत काही असतं तर सर्वात आधी माध्यमांनी शोधून काढलं असतं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. सकाळपासून बैठका घेणं आणि निर्णय घेणं त्यांची पद्धत आहे.
