संजय राऊतांच्या संगतीत राहून पृथ्वीराज चव्हाण यांना वाण नाही पण गुण लागला – शंभूराज देसाई

राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत. या चर्चांवर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोठा राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील, त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला आहे.

यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी चव्हाणांना संजय राऊतांचा गुण लागल्याचा टोला लगावला आहे. चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री बदलाची केलेली भविष्यवाणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह आमदारांना विशेषतः शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागण्याचे दिसून येत आहे. यावर भाजप-शिवसेना आणि काँग्रेस असा कलगीतुरा रंगणार आहे. संजय राऊतांच्या संगतीत राहून चव्हाण यांना वाण नाही पण गुण लागल्याची टीका देसाई यांनी केली आहे. चव्हाणांच्या भविष्यवाणीवर देसाई म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण नजीकच्या काळात संजय राऊतांना भेटलेले दिसतायत.

शंभुराज देसाई म्हणाले की,आमच्या घरात वाकून पाहण्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षातील आमदारांकडे लक्ष द्यावे.आमच्या अपात्रतेबाबत कायद्याने, नियमाप्रमाणे जे व्हायचे ते होईल, ते आम्हाला मान्य असेल. त्यामुळे चव्हाणांनी राऊतांच्या संगतीत राहून भविष्य वर्तवण्याचे नवीन काम करू नये, असाही देसाईंनी चव्हाणांना सुनावले आहे.​​​​​​

“विधानसभा अध्यक्ष सर्व गोष्टी तपासून अपात्रतेचा निर्णय घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे संजय राऊत यांच्या संगतीत राहून पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्य वर्तवण्याचं काम करु नये,” असा सल्लाही शंभुराज देसाई यांनी दिला आहे.