नरखेड रेल्वे गाडीला कोरोनंतर बडनेरापर्यंतच चालविण्यात येत असल्याने गजानन भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गाडी नागपूर ते भुसावळ नरखेड अशा मार्गावर पूर्वपणे चालवावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मंगळवारी केली. डॉ. बोंडे यांनी दिल्लीत संसंद भवन येथे वैष्णव यांची भेट घेत त्यांना पत्र दिले. रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार, नरखेड-भुसावळ नरखेड रेल्वे गाडी क्रमांक 013367, 01368, 01369, 01369 ही गाडी कोरोना काळापर्यंत चालू होती.
त्यानंतर नरखेड-भुसावळ असा प्रवास करणाऱ्या गाडीला शॉर्ट करत केवळ नरखेड ते बडनेरापर्यंतच चालवण्यात येत आहे. या गाडीने शेकडो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता शेगावला जातात. ही गाडी केवळ बडनेरापर्यंत चालवली जात असल्याने भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांची गैरसोय होऊ नये, याकरिता ही गाडी नागपुर नरखेड मार्ग भुसावळपर्यत चालविन्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मंगळवारी डॉ.बोंडे यांनी दिल्लीतील संसंद भवन येथे ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वे विभागातील विविध कामकाजाविषयी चर्चा देखील केली. नागपूर-नरखेड- भुसावळ या मार्गावर जर ही गाडी सुरू झाली तर नागपूर-कळमेश्वर, काटोल येथील गजानन भक्तांना सुद्धा शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेता, येईल असेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले.

