उद्धव ठाकरे यांची उद्यापासून प्रसारित होणारी मुलाखत म्हणजे हास्य जत्रेचा महाएपिसोड – नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधत असताना नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची उद्यापासून प्रसारित होणारी मुलाखत म्हणजे हास्य जत्रेचा महाएपिसोड असणार आहे.या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आलेला आहे. कुटुंब प्रमुख या शब्दावर माझा आक्षेप आहे. कारण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्ही शिवाजी महाराजांना आमचा कुटुंब प्रमुख मानतो.

पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जेव्हा जबाबदारी मिळाली होती त्यांनी गळ्याला पट्टा बांधून फक्त स्वतःच्याच कुटुंबाला सांभाळलं आहे. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणं सांभाळलं नाही. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करण्याची गरज आहे. कारण सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीमध्ये बसला आहे.”

तसेच 26 जुलै च्या महापुरात बाळासाहेबांना एकट टाकून उद्धव ठाकरे फॅमिली सोबत ताज हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी मला हॉटलेच्या लॉबीमध्ये रश्मी ठाकरे भेटल्या होत्या. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतऐवजी राणेंकडून मुलाखत घेऊन दाखवावी तर कळेल आवाज कुणाचा, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना इशारा दिला.

लोक उत्सुक आहेत – केशव उपाध्ये
रिलिज झालेल्या या मुलाखतीच्या प्रोमोवर टीका करताना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मित्र पक्षाला कसा धोका दिला ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत, मुख्यमंत्री असताना घरी बसल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत, अहंकारापोटी पक्ष फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.