“संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे”, असे नमूद करून आगामी काळात देशात करसंस्कृती विकसित करण्यासाठी आयकर विभागाने नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६४ वा आयकर दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या आयकर विभागातर्फे करण्यात आले होते. गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने आयकर भरणे तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुलभ केले असून आयकरदाते वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत आयकरापासून मिळणारे उत्पन्न १६७ टक्क्यांनी वाढले आहे, तर आयकर परताव्याची संख्या २.९६ कोटींहून ७.६३ कोटी इतकी वाढली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढत आहे. भारताला व्यापारस्नेही देश बनवणे आपले उद्दिष्ट आहे. या दृष्टीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर प्रशासकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे राज्यपालांनी सांगितले. देशाला ५ ट्रिलियन डॉलर व राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी तसेच ‘ब्रँड इंडिया’ बनविण्यासाठी प्रत्येकाला प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, पारदर्शकता व देशाप्रति बांधिलकी जपावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.
