शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो विषय आणता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते.
या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. यावेळी संभाजी भिडे यांच्या आवाजाचे नमुने घेतले जातील असं फडणवीस म्हणाले. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तर वीर सावरकरांबाबत काँग्रेसच्या मुखपत्रात आक्षेपार्ह लिखाणावरूनही गुन्हा दाखल केला जाईल असं फडणवीसांनी म्हटलं. यानंतर काँग्रेस आमदारांनी सभागृहात घोषणाबाजूी केली. तसंच निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या निषेध केला. त्यानतंर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्यागही केला.
संभाजी भिडे यांच्यासह अन्य दोघांवर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली असून, त्यांनी स्वीकारली आहे. तर राजापेठ पोलिसांकडे त्या कार्यक्रमाचे फोटो किंवा व्हिडीओ उपलब्ध नसून, ते आता संभाजी भिडे यांचा व्हाईस सॅम्पल घेणार आहेत. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांकडेही संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरुन संभाजी भिडेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याचाही चौकशी केली जाईल अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, कोणत्याही राष्ट्रीय नेत्यासंदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी, त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. त्यांचे कार्य चांगले आहे. पण तरीही त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कोणालाही असा अधिकार नाही. महापुरुषांवर असं वक्तव्य केलं त्याच्यावर कारवाई होईल.
जर आता महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आंदोलन केली जात आहेत. अगदी त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केल्या गेलेले वादग्रस्त वक्तव्यसुद्धा खपवून घेणार नाही त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
