पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहे. येत्या 5 आणि 6 ऑगस्ट शाह पुणे दौऱ्यावर येणार आहे. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देऊन, गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांनी जाहीर झाला होता. या पुरस्काराला शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. त्यांच्या या भेटीवर अनेकांचं लक्ष लागून होतं.
नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर पुणे मेट्रोच्या फेस-1 चे उद्घाटन केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 10000 पेक्षा जास्त घरांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.येत्या 2024 च्य़ा निवडणुकांसाठी भाजप पुण्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर त्यांनी लगेच आपला दौरा आखला आहे. त्यातच राज्यात सत्तानाट्यदेखील बघायला मिळालं. यंदा भाजपने अजित पवारांचीदेखील साथ घेतली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यात बारामती पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.
या दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शाह यांनी बराच वेळ राखीव ठेवला आहे. त्यात ते कदाचित पुण्यात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची किंवा भाजप नेत्यांशीदेखील संवाद साधण्याची शक्यता आहे. पुणे पोटनिवडणुकीचा पराभवानंतर भाजपने पुण्याकडे चांगलच लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे अनेक नेते पुणे दोऱ्यावर येताना दिसतात.
