नितीन देसाईंच्या मृत्यूची सखोल चौकशी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितीन चंद्रकांत देसाई यांचे पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रुग्णालयात करण्यात आले. नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. यावर रायगड पोलिसांनी माहिती दिली आहे की, चार डॉक्टरांच्या पथकाने कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले आहे. पुढील तपास सुरू आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना कुणी आत्महत्येस प्रवृत्त तर केलं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

परंतु त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेत करत एन.डी. स्टुडिओ संदर्भात मुद्दा मांडला. यावेळी एन.डी. स्टुडिओ सरकारनं ताब्यात घ्यावा, असं अशोक चव्हाण म्हणाले.”चंद्रकांत देसाई यांनी काढलेल्या 180 कोटींच्या कर्जाचे 250 कोटी झाले. राष्ट्रीय कंपनी विधी लवादाने न्याय दिला. रसेश शहा यांच्या एडलव्हाएज या कंपनीचे पहिलं प्रकरण नाही. आधुनिक सावकारी सुरु आहे. मॅनेजर आणि नितीन देसाई यांच्या काही क्लिपचा तपास सुरु आहे. व्याज वसूल करण्याची पद्धतीत सामान्य माणूस आत्महत्येपर्यंत जातो. रसेश शहा आधुनिक पद्धतीची सावकारी करत आहेत. केवळ अपघाती मृत्यूची चौकशी करु नका. यामागे कंपन्यांची कार्यपद्धतीची चौकशी झाली पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ नितीन देसाई यांनी काल आत्महत्या केली आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं होतं. अनेक राजकीय पक्षाचे काम देखील ते करत होते. दिल्लीतील चित्ररथ देखील तेच करत होते. पंतप्रधान यांनी वाराणसीला जे घाट केले त्यामध्ये देखील देसाई यांनी काम होतं .त्यांच्यावर कर्ज झालं होतं. स्टुडिओवर कर्ज होतं. त्यांचा स्टुडिओवर कब्जा करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले गेले आहेत का? त्यांच्यावर काही दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी जोर जबरदस्ती केली गेली का? नियामाच्या बाहेर जाऊ त्यांच्यावर इंट्रेस लाऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला का? या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी सरकार करेल. तुमच्याकडे काही पुरावे असेल, तर द्या. त्यांचीही चौकशी करु, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचा हरहुन्नरी कलावंत आपल्यातून निघून जाणे हे अतिशय वेदनादायी आहे. नितीन देसाई यांच्यावर काही कर्ज झालं होतं. या कर्जामुळे त्यांचा स्टुडिओ गहाण होता. दुर्देवाने एनसीएलटीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला होता. देसाई आपला स्टुडिओ सोडवण्याचा प्रयत्न करत होते, असं फडणवीस म्हणाले.