‘शासन आपल्या दारी’ योजनेमुळे आता सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सध्या सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत. यासाठी सर्व विभागातील अधिकारीही मनापासून काम करत आहेत.जेजुरीत आज (ता. ७ ऑगस्ट) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आता दाखल्यापासून लाभापर्यंत सर्व मिळत आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा फायदा घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
मुंबईत काल संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे ते म्हणाले, काही लोकांचा राजकीय बोलल्याशिवाय दिवसचं जात नाही. त्यांना फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणतना थोडसं काहीतरी वाटलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच कोणंतही काम आणलं तरी त्यांनी केलं आहे, याची तरी जाणीव ठेवायची होती, देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर आहेत, ते चौकार, षटकारही मारतात आणि विकेटही घेत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ज्याचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज आम्ही केलायं, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. जेजुरीमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली.
देवेंद्र फडणवीसांच्या काळातील योजना मधल्या काळात अंहकारीपोट्या बंद केल्या. पण आम्ही त्या वर्षभरात सुरू केल्या. राज्यकर्त्यांकडे अहंकार नसायला पाहिजे. आम्ही दिल्लीला गेल्यावी आमची टिंगल केली जाते. पण, आम्ही राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे जातो. तुम्ही कितीही टीका केली तरी आम्ही राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे जाणारच. आम्हाला कोणती नोटीस आली; म्हणून आम्ही तिकडे गयावया करण्यासाठी गेलो नाही, तर विकासासाठीच आम्ही दिल्लीला जातो, असेही शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
