धुळ्यात शरद पवार यांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची राष्ट्रवादीला सोडचिठी

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ठोकला आहे.पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

गोटे यांनी म्हटले आहे, की भाजपमधील गटबाजी, गुंडाना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीस कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देवून बाहेर पडलो होतो. राष्ट्रवादीत स्वेच्छेने प्रवेश घेतला. सलग चार वर्षे शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले अर्थात लोकसंग्रामच्या सर्वच कार्यकत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करण्याचा माझा निर्णय मान्य होता असे नाही. पण केवळ माझ्या प्रेमापोटी सर्वच कार्यकर्त्यांनी आपली नाराजी माझे जवळ स्पष्ट शब्दात बोलून दाखविली. त्याच बरोबर ‘तुम्ही जेथे आम्ही तेथे’ अशी भूमिका स्विकारुन माझ्या समवेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात कार्यरत झाले, असे गोटे यांनी सांगितले. पक्षासाठी केलेल्या कार्यक्रमांचा त्यांनी यावेळी सविस्तर उल्लेख केला.

दरम्यान, अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शरद पवार आणि अजितदादा गट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा सांगण्यासाठी आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत या कार्यालयावर आपला दावा ठोकला. शेवटी पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या कार्यालयाला दोन्ही गटातल्या लोकांनी कार्यालयाला आपापले कुलूप लावले आणि पक्ष श्रेष्ठ सांगतील तो निर्णय मान्य करण्याचे ठरवण्यात आले. मात्र रात्री उशिरा दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

अनिल गोटे हे धुळे शहराचे माजी आमदार आहेत. सन २०१४ मध्ये भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर भाजपमध्ये त्यांचे अंतर्गत वाद झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये भाजपचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षात गोटे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धुळे मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.