महाराष्ट्रातली युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची काल ( ८ऑगस्ट ) अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीनंतर जेवणाची देखील खास व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी पुरणपोळी, पिठलं भाकरी यांची विशेष मेजवानी ठेवण्यात आली होती. दरम्यान, एनडीएच्या पार पडलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना विषयी केलेल्या वक्तव्यांना काही राजकीय कंगोरे जरुर असण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षात देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत.आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं नरेंद्र मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय.

आपली युती फक्त निवडणुका पुरती नाही ही भावनिक युती आहे. आपली युती 25 वर्षापेक्षा जास्त, ती अभेद्य राहावी. आता खासदारांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. तसेच सत्तेत सगळ्यांचा समसमान वाटा असेल, असंही मोदींनी म्हटलं. दरम्यान अनेक नेत्यांमधे क्षमता असताना त्यांना पंतप्रधान होता आलं नाही. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावललं गेल्याचा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी केला.