शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत राज्यातील संस्थांना विशेष अर्थसहाय्य योजना राबविणे आणि योजनेचे स्वरूप निश्चित करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतमालाला अधिक दर मिळण्यास मदत होईल. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पणन महामंडळाला या बैठकीत दिल्या.
राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. विकसित राष्ट्रांमध्ये कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त आहे. शेतमाल प्रक्रिया ही महत्त्वाची बाजार सेवा आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये कच्चा माल विक्रीसाठी नेण्यापेक्षा मालावर प्रक्रिया करुन माल विकल्यास चांगली किंमत मिळते. त्या दृष्टीकोनातून भारतातील शेतमाल प्रक्रिया उद्योगांना शासनामार्फत अनुदान (सबसीडी) देऊन कृषी उद्योगांना मोठी चालना देण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतमाल प्रक्रिया उद्योगात वाढ व्हावी, शेतीचे उत्पादन दुप्पट होईल, कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल त्यातून शेतकऱ्यांना आशादायी दिलासा मिळेल.
