पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरात आजपासून ही समस्या संपणार आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण शनिवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उड्डाणपुलाचा आराखडा ‘आयआयटी’ मुंबईकडून तयार करून घेतला आहे. तज्ज्ञ संस्थांकडून तपासून घेतला. पुढच्या २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. असे भूमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी सांगितले होते. महापालिकेने नियोजन केलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलावा. अशी अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली होती. त्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर दिली होती.
