यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे तसेच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पिके जगवायची कशी अशी भीती वाटत होती. पण आता राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. आज देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील या पावसामुळे सध्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.दरम्यान,आजही हिमाचल,उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपुरात पावसाला सुरुवात झाली. नागपूरसह विदर्भात सर्वदूर पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. परंतु आता पाऊस परतल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने पुढील पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात 1972 मध्ये सर्वाधिक पावसाचा ब्रेक झाला होता. त्यावेळी 18 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान पाऊस नव्हता. आता 1 ते 17 ऑगस्टपर्यंत पाऊस नव्हता. त्यामुळे 1972 नंतर हा सर्वाधिक पावसाचा ब्रेक आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सक्रिय होऊन पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान आहे. उकाडाही जाणवत आहे. पावसासाठी हे पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने 35 लाख हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. अत्यल्प पावसामुळे खरिपाची उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
