कर्नाटकातील बागलकोट येथे परवानगी न घेता उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून कर्नाटक सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडवणे म्हणून संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे अनेक वेळा प्रकार समोर आले आहेत. अशातच दोन दिवसापूर्वी बागलकोट येथे देखील शहरात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हा पुतळा काढून टाकला आहे. यामुळे शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून या कारवाईला विरोध होत आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनीही याबद्दल आक्रमक भूमिका घेत ‘शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवा अन्यथा कॉंग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही…’ असा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे.
