पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली आहे. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत भीतीदायक भाष्य केले.पुणे शहरात १८ जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झाले की काय? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.
पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे. या संदर्भात मला माहिती जाहीर करण्यास मर्यादा आहेत. परंतु पुण्यात अतिरेक्यांची मोठी लिंक सापडली आहे. मी कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपणास सर्वांना हदरा बसेल, आपली झोप उडेल, अशी मोठी लिंक दहशतवाद्यांची आहे. या दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते जाहीरपणे सांगण्यास मर्यादा आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी आतापर्यंत तपासातून उघड झाली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या सोयी सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून ४० कोटी दिले आहेत. लोक सहभागातून ६० कोटी रुपये मिळवून देणार आहे. पुणे शहरात १०० पोलीस चौक्या आहेत. त्यांची अवस्था बिकट आहे. पंखे खडखड करत असतात. पुणे पोलिसांनी चोरीचा हस्तगत केलेला सात कोटींचा मुद्देमाल न्यायालयातून सोडवून नागरिकांना परत केला. पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.
मारामारी झाली. चोरांना पकडले हे चालत राहील. परंतु, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे ड्रग्जवाल्यांवर कडक कारवाई करावी. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. पथकाला अधिकार; तसेच दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या गोष्टींवर लक्ष द्यावे, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली.
