राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पहायला मिळत आहे. कांद्याचे निर्यात शुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केंद्र सकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारकडून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. कांदा खरेदीबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. त्यानंतर इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केली जात आहे. केंद्राचा हा निर्णय शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारा आहे. सरकार सुमारे 10 लाख मेट्रीक टन कांदा साठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभारही मानले.
दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र हा दर कमी असल्याचे म्हटले होते. शरद पवारांनी केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रती क्विंटला दिलेला 2410 हा भाव कमी आहे. अशी प्रतिक्रिया देत. सरकारने चार हजार भाव द्यावा अशी मागणी देखील केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सुनावलं,शरद पवारांनी आजच्या निर्णयाचं स्वागत करावं, शरद पवार हे 10 वर्षे कृषिमंत्री होते.त्या काळात देखील असा निर्णय घेतला नाही यावर राजकारण करू नये असं देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी श्रेयवादाच्या लढाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे पियुष गोयल यांना भेटले, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली तर यात तुमची अडचण काय? दोघेही सरकारमधील घटक आहेत. ही श्रेयवादाची लढाई अजिबात नाही. आम्ही या असल्या लढाईत नाही. आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेतकऱ्याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत.आमचे निर्णय सामूहिक असतात.
