कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आज पियुष यांची भेट घेऊन त्यांच्याशी कांद्याप्रश्नी चर्चा करत आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढीवरून दिल्लीत होणार बैठक सुरू आहे. अशातच कांदा प्रश्नावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यानंतर केंद्र सरकार 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल भावाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे यांनी ट्वीटरद्वारे याबाबतची माहिती दिली.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.’
पीयूष गोयल आणि कृषी धनंजय मंत्री मुंडे भेटण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. निर्यात बंदी नव्हती तेंव्हा (4 दिवसांपूर्वी) 2200 रुपयांच्या आसपास दर होता. आता 200 रुपये अतिरिक्त दर वाढवला आहे.
