भाजपसोबत युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. शिवसेना आणि भाजपा २५ वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर २५ वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं काही कारण नाही.
अजित पवार म्हणाले की, तुम्ही कुणालाही खासगीत विचारा, आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते. शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. असे अजित पवार म्हणाले.
भाजपाशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यभर सभा घेण्यास प्रारंभ केला आहे. येवला, बीडनंतर आता शरद पवारांची कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापुरात २५ तारखेला दसरा चौकात पवार कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
