महाराष्ट्रात एकीकडे शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांवर टोलेबाजी केली होती. त्यावरून आता हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि आमच्याविषयी असं बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की कळेल त्यांना, अस मुश्रीफ म्हणाले.
“जेव्हा एकनाथ शिंदे सगळे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं की आम्हालाही सत्तेत जाण्याची परवानगी द्या. म्हणजे गृहनिर्माण खातं किती ह्रदयाला कवटाळून बसले होते हे. मग तेव्हा कुठे गेला होता दादा तुझा धर्म? तेव्हा कशी सही केली होती तुम्ही? त्यावेळी गृहनिर्माण खातं जितेंद्र आव्हाड हृदयाला कवटाळून बसले होते. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार. असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.
