भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा करून भारतात परतले. भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
“शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे”, असं मोदी म्हणाले.
“ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे”, असंही मोदी म्हणाले.भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इतिहास रचला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी 23 ऑगस्ट रोजी पार पडली. त्यामुळे, इथून पुढे या दिवसाला ‘नॅशनल स्पेस डे’, म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरं केलं जाईल अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना केली.पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना महिला वैज्ञानिकांचं देखील कौतुक केलं. निर्माणापासून ते प्रलयापर्यंत संपूर्ण सृष्टीचा आधार ही नारीशक्ती आहे. चांद्रयान-3 मोहिमेत महिला वैज्ञानिकांची मोठी भूमिका होती, असं ते म्हणाले. यावेळी आपल्या भाषणानंतर त्यांनी महिला शास्त्रज्ञांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “‘चांद्रयान-3 लॅण्ड झाले तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मला कधी असे वाटते की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी उत्सुकता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. तुम्हाला लवकर तुम्हाला भेटायचं होते,” “तुमच्या मेहनतीला सलाम, तुमच्या संयमाला सलाम, तुमच्या जिद्दीला सलाम, तुमच्या चैतन्यला सलाम,”असे मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.
