प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला नाही. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले.याबाबत कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन २०२३-२४ मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याने त्याला तत्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा नमो महासन्मान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश कृषी मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून विविध अडचणीमुळे वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान आणि नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती. त्यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाआयटीचे विभागप्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून सुरू आहे. पी एफ एम एस प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
