80 टक्के भारतीयांचा अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास

पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्रात दोन वेळा सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल देशातील जनतेचा दृष्टिकोन काय आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदी पुढील वर्षी पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकणार आहेत. 10 पैकी आठ भारतीयांचा अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. लोकांचा असा विश्वास आहे, की गेल्या काही वर्षांत भारताचा दर्जा जगात वाढला आहे. असा निष्कर्ष पीइडब्ल्यू रिसर्च सेंटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचे समोर आले आहे. जगभरात सरासरी 46 टक्के नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत 34 टक्के जग प्रतिकूल आहे. 16 टक्के लोकांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. पीइडब्ल्यू या संस्थेने 20 फेब्रुवारी ते 22 मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात 24 देशांतील 30,831 जण सहभागी झाले. त्यात भारतातील 2611 नागरिकांचा समावेश होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत हा महाशक्ती बनण्याची शक्यता कितपत आहे तसेच भारतीयांना इतर देशांबद्दल काय वाटते, या गोष्टींबाबत सदर सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.

भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी आठ नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील 55 टक्के लोकांनी ‘अतिशय सकारात्मक’ असल्याचे मत नोंदविले आहे. मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण 20 टक्क्यांच्या आसपास असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.या सर्वेक्षणानुसार, इस्रायली लोकांचे भारताबाबत बहुतांशी सकारात्मक मत आहे. 71 टक्के लोकांनी भारताबाबत चांगले मत असल्याचे म्हटले आहे. प्यू रिसर्च सेंटर हे एक निष्पक्ष थिंक टँक आहे जे लोकांना जगावर परिणाम करणाऱ्या समस्या, दृष्टीकोन आणि ट्रेंडबद्दल माहिती देत असते.

दरम्यान, प्यूने सांगितले की, हे सर्वेक्षण 20 फेब्रुवारी ते 22 मे या कालावधीत करण्यात आले होते ज्यामध्ये भारतासह 24 देशांतील 30,861 प्रौढ लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये 2,611 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे जागतिक मत आणि इतर देशांबद्दल भारतीयांचे मत तपासण्यात आले.