मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं. मी मुंबईत नरेंद्र मोदींच्या नरड्यावर बसायला जात आहे, अशा आशयाचं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप’ म्हणत आहेत ती गरुड झेप नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे, अशा शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात ‘‘इंडिया’ची गरुडझेप! भयमुक्त भारत’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखातून विरोधकांच्या इंडिया आघाडीचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न इंडिया आघाडीचे नेते बघत आहेत. पण जनता त्यांच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढे जास्त प्रेम करेल. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी निष्प्रभ ठरल्याशिवाय राहणार नाही. जनता पूर्णपणे मोदींनाच साथ देतील.
महात्मा गांधीजींनी मुंबईतून ‘क्विट इंडिया‘चा नारा दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्यासारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे.मा. मोदीजींचा तुमच्या इंडिया विरोधातील संघर्ष हा स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव’ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींच देशसेवेचे कार्य अखंड सुरू राहणार आहे.
