“इंडीची भेंडी आघाडी”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; बैठकीत ममता बॅनर्जींना खुर्चीच मिळाली नाही

मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी रागानं बैठक अर्धवट सोडून पुन्हा पश्चिम बंगालकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. एनडीएच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात याचा उल्लेख केला, त्यामुळं तो चर्चेचा विषय झाला.फडणवीस म्हणाले, विरोधक जेव्हा एखाद्याचं मन वळवू शकत नाहीत तेव्हा ते कन्फ्युज करण्याचं काम करत आहेत. आमचे सर्व मित्रपक्ष फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही. इथं कुणालाच प्रश्न पडला नाही की आमची जाग नेमकी कुठे आहे? पण विरोधकांच्या बैठकीत ममता दीदी आल्या आहेत, त्यांना बसायला खुर्ची दिली नाही. त्यामुळं त्या रागानं निघून गेल्या. त्यांना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत. पवारांनी अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते पण थांबले नाही.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महायुतीची अवस्था इंडी आघाडी (I.N.D.I.A.) सारखी नसल्याची टीका केली. “मुख्यमंत्री, मी, अजित पवार आमच्यात पूर्ण संवाद आहे. एका विचाराने आम्ही चाललो आहोत. सगळे निर्णय एकत्र घेत आहोत. आमच्यात १०० टक्के समन्वय आहे. आमची परिस्थिती इंडी आघाडीसारखी नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनाही टोला लगावला. “शरद पवारांनी तेव्हा ममता बॅनर्जींना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांनी अजित पवारांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ते थांबले का? आता सगळ्यांना नेमकी दिशा समजलीये की कुठल्या दिशेनं जायचंय. त्यामुळे ममता दीदी तिथून निघून गेल्या”, असं फडणवीस म्हणाले.

माझा या 36 पक्षांना प्रश्न आहे त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, आतापर्यंत 5 पक्षांनी दावा ठोकला. ज्याला खरंच पंतप्रधान व्हायचं त्या राहुल गांधींचं नावच घ्यायला कुणीच तयार नाही. आघाडीच्या पत्रकात सांगितलं की शक्यतो एकत्रित लढू. म्हणजे आजच इंडिया आघाडीचे भेंडी आघाडी झाली हे समजा. कारण ते पत्रकात सुद्धा एकत्रित लढू असे म्हणू शकत नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी इंडिया आघाडीची खिल्ली उडविली.माझ्यात,अजित पवार आणि शिंदे यांच्यात पूर्ण संवाद आहे. येथे आल्यावर कोणालाच प्रश्न पडला नाही की आमची जागा कुठे आहे. कारण आम्ही मनाने एकत्र आहोत, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

‘एक देश एक निवडणूक’ व्हावी की नाही, याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही अतिशय योग्य संकल्पना आहे. यामुळे पैस वाचतील आणि त्याचवेळी वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असल्यामुळे आचारसहितेत जाणारे दिवस, कामाचे कमी होणारे दिवस कमी होतील. निवडणुका म्हटल्या की, निवडणूक फॉर्ममध्ये सुधारणा करण्यात अनेक वेळा उशीर होतो. विशेषत: वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारे असली की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्यामुळे एकाचवेळी सर्व निवडणुका झाल्या तर त्याचा देशाला फायदा होईल. देशाच्या विकासामध्ये या निर्णयाचा मोठा वाटा असेल. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.