देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे. असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे काढले.

प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे निमित्त साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

“तुम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार” अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे‌. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करत आहे. संघटित राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.

भारतीय लोकशाही हे सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे‌. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यात कला व साहित्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते‌. समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.