गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वरळी येथील एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग 2023 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.

राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.