राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारवर केली. ते जळगावमध्ये आयोजित सभेत बोलत होते. त्यांच्या या घणाघाती टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहेत. १०-१० मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. उर बडबून काही उपयोग नाही.”“३०-३५ वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून हाकललं, तुमचं काय राहिलं आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहे,” असं गिरीश महाजनांनी सांगितलं.
“सर्वात जास्त लाल दिव्याच्या गाड्या 15 ते 20 वर्ष सत्ता नसताना विरोधी पक्ष म्हणून भोगल्या आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली आहे का? तुम्हाला लोकांनी विधानसभेत पाडलं.“देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली. पोलिसांकडून चूक झाली आहे. माफ करा. माफी मागायलाही मोठं मन लागतं. यालाही मोठंपण लागतं. मग यावरुन त्यांनी राजीनामा द्यावा, असं म्हणणं चुकीचं आहे”, असं महाजन म्हणाले.
“एका ओळीचा अध्यादेश काढून चालत नाही. हा विषय अध्यादेश काढण्यासारखा किंवा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेता येईल, असा नाहीय. आपण किती वर्ष लढतोय, किती वर्षांपासून मागणी होतेय. आमचं सरकार असताना चार वर्ष किती सर्कस करावी लागली आणि तरीही हे आरक्षण टिकवलं होतं. सेशन कोर्ट, हायकोर्टात टिकवलं. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा दुर्लक्ष झालं आणि आरक्षण टिकलं नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. आमचं सरकारच मराठा समाजाला न्याय देईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
